कर्ण बधिरत्वाला त्यांनी जिंकले... त्याचाच हा कानमंत्र
जयप्रदा व योगेशकुमार भांगे, शेटफळ,(ता. मोहोळ, जि. सोलापूर)
प्रसून हा दीडेक वर्षापर्यंत अगदी "नॉर्मल' बालकासारखा होता...मात्र नंतर एकटेपणी अंधारात मोठ्यानं रडणं, नजरेआडून मारलेल्या हाकेला प्रतिसाद न देणं, या वयात होणारी "बाबा', "आई', "दादा', अशी बडबड न होणं, अशी लक्षणं आढळून आली व ते हबकून गेले. आपला मुलगा कर्णबधिर असल्याचे तपासणीअंती त्यांच्या लक्षात आले...मग सुरू झाला अखंड संघर्ष...या संघर्षावर त्यांनी कशी मात केली?
एकुलता एक, कर्णबधिर अन् त्यातही भंडावून सोडणारी बडबड...या तिन्ही बाबी एकत्र येणं तसं दुरापास्तच. कारण, अपंग अपत्याला एखादा सोबती म्हणून आणखी अपत्य होऊ देण्याची मानसिकता. तसेच कर्णबधिरपणाचे पर्यवसान मूकबधिरपणात होणं हे वास्तव. तरीही या अपंगत्वावर मात करून बोलणारा मुलगा... हे सारं आम्ही आनंदानं अनुभवतोय...
प्रसूनचा जन्म 2000 सालचा. तो चार वर्षांचा होईपर्यंत दुसऱ्या अपत्याचा विचार न करण्याचं आमचं ठरलेलं होतं. पहिलं वर्ष-दीड वर्ष आनंदात गेलं; पण आयुष्यात पुढं वेगळंच वाढून ठेवलं होतं. दुडदुडणारी प्रसूनची पावलं हाक मारली तरी थांबत नसत...एकटेपणी अंधारात मोठ्यानं रडणं, नजरेआडून मारलेल्या हाकेला प्रतिसाद न देणं,
या वयात होणारी "बाबा', "आई', "दादा', अशी बडबड न होणे या लक्षणांमुळे छातीत धस्स झालं. सोलापूरच्या डॉ. विद्याधर बोराडे यांनी "बेरा' टेस्टसाठी पुण्याला पाठवलं. आमची भीती खरी निघाली. प्रसून 90 टक्के कर्णबधिर होता! म्हणजेच तो मुका बनणार होता. त्याची अभिव्यक्ती, शिक्षण, समाजातलं वावरणं...या विचारांनी आम्ही कोलमडलो.
उपचारांसाठी पुण्यात
आम्ही ग्रामीण भागातले. अंधश्रद्धा, देवभोळेपणा, अज्ञान, व्रत-वैकल्ये, पाप-पुण्य यांना प्रमाण मानणारी इथली मानसिकता. अनेक जण अनेक प्रकारचे उपाय सुचवीत होते...पण प्रसून बोलू शकेल, असं कुणीच ठामपणे सांगत नव्हतं. काही ईएनटी तज्ज्ञ तर "बोलेल चार-पाच वर्षांनी आपोआप,' असं सांगून मोकळे होत होते. आम्ही मात्र सैरभैर झालेलो होतो. हा संघर्ष कुठपर्यंत चालणार समजत नव्हतं. दिशा नव्हती. प्रसिद्ध ऑडिऑलॉजिस्ट अरुण सांगेकर यांनी पुण्यात प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या अलका हुदलीकर यांचा पत्ता दिला. अलकाताईंना आम्ही देव मानतो. त्यांनी आम्हाला सावरलं. तुमचा मुलगा एकटाच नव्हे, तर दर हजारी दहा जण कर्णबधिर असतात, हे सांगितलं. रडत बसण्यापेक्षा प्रयत्न केलात तर हे मूल नक्की बोलेल, याची हमी दिली. त्यांच्याकडील मुले व पालकांच्या भेटी घालून दिल्या. थोडाफार आशेचा किरण दिसू लागला; पण संघर्ष कायम होता.
चुकून दुसऱ्याच बसमध्ये!
पुणं आम्हाला नवीन होतं. नातेवाईक नाहीत की मुक्कामाला हक्काचं ठिकाण नाही. योगेशचंद्र चौधरी हा प्रसूनचा मामा चिंचवडला मित्रांसोबत राहायचा. त्याचे व मित्रांचे सहकार्य व्हायचे. तरीही प्रभात रस्त्यापासून चिंचवडला कसरत करत जावं लागायचं. पुण्यात पहिल्यांदा आठवड्यातून एकदा यायचो.
शेटफळ ते पुणे हा 185 किलोमीटरचा प्रवास असह्य व्हायचा. कधीकधी गर्दीमध्ये उभं राहून जावं लागायचं. एकदा भिगवणला बसमधून उतरल्यावर आमच्या नजरचुकीने प्रसून दुसऱ्याच बसमध्ये चढला. आमची शोधाशोध सुरू झाली. काळजाचं पाणी झालं. प्रसून ज्या बसमध्ये चढला होता, ती बस स्टॅंडमधून बाहेर निघाली होती. त्याच्या रडण्यानं व प्रवाशांच्या लक्षात आल्यानं त्याला खाली उतरवण्यात आलं. पुन्हा असं झालं तर हा बोलणार कसा, पत्ता सांगणार कसा, ही कल्पनाच अस्वस्थ करणारी होती. म्हणून प्रवासामध्ये पत्ता व फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी त्याच्या खिशात ठेवू लागलो. त्रास कितीही होऊ देत, प्रसून बोलला पाहिजे, हा एकच ध्यास होता.
अलकाताईंचा दिलासा
अलकाताईंनी स्पीच थेरपीचे धडे दिले. श्रवणयंत्रांबाबत मार्गदर्शन केलं. त्यांचा व्यासंग, त्या विषयावरील प्रभुत्व, मुलांविषयीची तळमळ हे आम्हाला भावलं. त्यांच्या कडक शिस्तीनं आम्हाला घडवलं. वेळ पाळणं, स्पष्ट उच्चार, "स्पीच थेरपी' मधील बारकावे यात काही चुका झाल्या तर अलकाताई रागवायच्या. रडायला यायचं. कधी प्रसूनचा प्रतिसाद पाहून शाबासकी द्यायच्या. मग प्रेरणा मिळायची. अधूनमधून प्रवास व खाण्या-पिण्याची दगदग सहन व्हायची नाही. तिघातला एक जण तरी हमखास आजारी पडायचा. मग पुण्याची फेरी आम्ही टाळायला बघायचो. ...पण प्रसून बोललाच नाही तर त्याच्यात आणि इतर जनावरांत फरक काय? ही भावनाच गप्प बसू द्यायची नाही. मग तसंच पुणं गाठायचो. अलकाताईंचा प्रभाव व इतर मुलं पाहिली की, आमची डाउन झालेली बॅटरी "चार्ज' व्हायची. पुन्हा उमेद यायची.
अखेर यश आले
तब्बल दहा-अकरा महिन्यांनंतर प्रयत्नांना यश आलं. आवाजाला, सूचनांना प्रसूनचा प्रतिसाद वाढला होता. एके दिवशी खेळताना पडला व "आई' असा शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडला. तेव्हा आमच्या डोळ्यांतून टचकन् आनंदाश्रू आले. पुन्हा नवी उमेद आली. शब्द, वाक्य, उच्चारता येणारी अक्षरं, एखादा प्रसंग नीटपणे पाहणं, त्या प्रसंगाचं वर्णन कसं करायचं, हे प्रथम ऐकायला शिकणं, मगच बोलणं...हे सारं मनापासून सुरू झालं. दोडके, बटाटे, धुणे, चिरणे, मसाले, फोडणी, भांड्यांची नावं हे सारं समजावताना एक भाजी करायला तास-तास लागे. पण प्रसूनला समजणं, त्यानं ऐकणं, व बोलणं, याच्या पलीकडे आम्हाला कुठलीच गोष्ट महत्त्वाची वाटत नव्हती. अलकाताईंनी आम्हाला आणखी खूप पुढं नेलं. आज प्रसून जिल्हा परिषदेच्या नॉर्मल मुलांच्या शाळेत इयत्ता पाचवीत आहे. अभ्यासातील प्रगती तर उल्लेखनीय आहेच; पण मित्रांत व समाजात त्याचा संवाद दिवसेंदिवस वाढला आहे. शाळेत मित्रांना-शिक्षकांना व घरी आम्हाला प्रश्न विचारून भंडावून सोडतो. एखाद्याचं बोललेलं नीटपणे समजलं नाही तर "स्पष्ट उच्चारात बोला ना. मला नीटपणे ऐकू येत नाही म्हणून मशिन दिसत नाही का ? मला नीट कळलं नाही तर मी तुमच्याशी संवाद कसा साधणार ?' असा दम भरायलाही तो कमी करीत नाही ! सारे श्रम, पैसा योग्य दिशेनं सार्थकी लागल्याचं समाधान आम्हाला मिळालं.
व्यापक पातळीवर जा
एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. आमच्यासारखे अनेक पालक हतबल आहेत. सैरभैर आहेत. महागडी श्रवणयंत्रे, गरज नसताना "कॉक्लिअर इन्प्लांट'सारख्या लाखो रुपये खर्चाच्या शस्त्रक्रिया, चुकीचे समुपदेशन, जाहिरातबाजी यांद्वारे काही व्यावसायिकांकडून हे अगतिक अनेकदा पालक लुबाडले जाताना आढळतात. एवढे करूनही "स्पीच थेरपी'ची चुकीची पद्धत असल्यास पदरी निराशा येत आहे. मुलाच्या नशिबी मुकेपणा येत आहे. केवळ चार-पाच हजारांची श्रवणयंत्रे व योग्य "स्पीच थेरपी'द्वारे कर्णबधिर बालके बोलू शकतात, हे कुणी या पालकांना समजूनच देत नाही. योग्य "स्पीच थेरपी'ऐवजी कमिशन जास्त मिळणारी महागडी श्रवणयंत्रे माथी मारण्याचे काम काही व्यावसायिक करीत आहेत. खर्च जास्त येतो, या गैरसमजापोटी काही पालक या प्रक्रियेकडे फिरकतही नाहीत. मुलांना मूकबधिर शाळेत दाखल करून मोकळे होतात. कर्णबधिर मुलांच्या बाबतीत समाजात असे भयंकर चित्र निर्माण झालेले आहे. हे आम्ही जवळून अनुभवतोय.
पैसा, वेळ आणि उमेद खर्चून मूल दहा-बारा वर्षांचं झाल्यावर अनेक पालक आमच्याकडे येतात. आजवर दिशाभूल झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर अक्षरशः रडतात. खरं तर आता फार काही उपयोग होणार नसतो. कारण माणसाचं भाषा शिकण्याचं वय पहिल्या पाच-सहा वर्षांचंच असतं. आम्हालाही वाईट वाटतं. हे कुठंतरी थांबायला हवं. अमेरिकेसारख्या प्रगत देशात महिनाभरातच बाळाची "बेरा' टेस्ट करतात. बालक कर्णबधिर असल्यास आई-वडिलांना स्पीच थेरपी शिकविली जाते. म्हणून त्यांच्याकडे मुकेपणाची उदाहरणे दुर्मिळ आहेत. आपल्याकडेही अशा मुलांसाठी व्यापक पातळीवर काहीतरी करा, असं अलकाताईंचं सततचं सांगणं असतं.
आता इतरांनाही मार्गदर्शन
साऱ्या परिस्थितीचा विचार करून आम्ही "विजयराज डोंगरे यूथ फाउंडेशन'अंतर्गत "व्हाइस ऑफ द व्हाइसलेस'ची स्थापना केली आहे. कर्णबधिर मुलांचा शोध घेणे व त्यांना बोलायला शिकविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. समाजातून पुढे आलेल्या दातृत्वातून ही संस्था आकार घेणार आहे. या निधीतून ग्रामीण गरजू मुलांची तपासणी करणे, श्रवणयंत्रे पुरवणे, स्पीच थेरपीबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करणे, कर्णबधिरांसाठीच्या सरकारी योजनांची माहिती पालकांपर्यत पोचवणे, पालकांचे मनोधैर्य उंचावणारी व्याख्याने आयोजित करणे असे उपक्रम सुरू करता येतील. गेले वर्षभर काही मुले येत आहेत. ती भाषा समजून बोलू लागली आहेत. गरजूंना मदत करण्याची आमची इच्छा आहे...कारण ही समस्या केवळ त्यांच्याच घरातील नव्हे, तर आमच्याही घरातील आहे.